top of page

जातीभेद निर्मुलन

Updated: Oct 4, 2021

जातीव्यवस्था नाही तर वेगवेगळी स्मशानभूमी का ?

Pramod Mandave ShivShakti social foundation
जातीभेद सारे विसरून जाऊ, मिळून मिसळून सुखी राहू : बहुजननायक मा. प्रमोदभाऊ मांडवे

शिवाजीनगर ता. कडेगांवला स्वातंत्र्यदिनी ग्रामसभा भरली होती. वेगवेगळ्या प्रश्नांवर खलबत झाल्यावर शेवटी 'आणखी काही समस्या असतील तर विचारा' असे आवेशात ग्रामसेवकांनी विचारले, जणू सगळ्या समस्या आधीच सोडवल्या गेल्या होत्या. एक सैनिक सेवेत कार्यरत असणारा बौद्ध समाजातील तरुण माझ्या शेजारी उभा होता. तो म्हणाला, 'ह्या गावात जातीव्यवस्था आहे का?' प्रश्न साधा आणि सरळ होता त्याचे उत्तर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी द्यायचे होते. सगळे गप्प झाले होते. कोणी हो पण नाही आणि नाही पण नाही. काहीच बोलत न्हवते. मला थोडा प्रश्न चुकीचा वाटला. कारण मी सगळ्या जाती-धर्माच्या लोकांच्या घरात जात होतो. त्यांच्या घरी जाऊन जेवत होतो. 12 बलुतेदार माझ्या घरी येऊन सन्मानाने बसत होते. मला कधी कुठे भेदाभेद दिसला नाही. म्हणून मी पण त्या तरुणाला विरोध केला आणि म्हणालो 'हे काय बोलताय तुम्ही?' 'मी जात नाही मानत.' सगळे गप्प बसले होते. तो तरुण म्हणाला 'मग प्रत्येक समाजाची स्मशानभूमी वेगळी का आहे?' आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. खरंच आमच्या गावात जातीव्यवस्था अस्तित्वात होती. मरणाऱ्याच्या शरीराला मुस्लिम धर्मात दफन केले जाते आणि हिंदू धर्मात दहन केले जाते. मुस्लिम आणि हिंदूंची स्मशानभूमी वेगवेगळी हे समजू शकतो. पण हिंदूंच्यातचं किंवा हिंदू संबंधित इतर धर्म आणि जातींमध्ये वेगवेगळी स्मशानभूमी कशासाठी? म्हणजे घरात जातीव्यवस्था नाही पण स्मशानात आहे असा त्याचा अर्थ होता. आणि मरताना कसली जात ! शरीरातील चेतना संपली, माती झाली. कुठेही ते शरीर जाळलं तरी राख होऊन त्याच मातीत मिसळणार आहे. मग कसला भेदाभेद ? माझी मान त्या तरुणाच्या प्रश्नाने खाली गेली होती. जात आणि मोठेपणा एवढा खोलवर रुजला होता की सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांनी मुक्याचं गिळल होतं. सगळेजण राजकारण बघत होते.

मग मी म्हणालो खरं आहे. संविधानाने सगळ्यांना समान अधिकार दिलेत म्हणून इतर समाजांना सुद्धा दहन करण्यासाठी एकच स्मशानभूमी असली पाहिजे. तरच ही स्मशानभूमीतील जातीव्यवस्था संपेल. सगळे गावपुढारी मुके झाले होते. कोणी काहीच बोलायला तयार न्हवते. मला राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही. वास्तविक मी कधीही गावात एकही निवडणूक लढली नाही. आणि लढायचीही इच्छा नाही. जातीव्यवस्था निर्मूलन हा माझा मुख्य उद्देश आहे. म्हणून सगळ्या जातीतल्या लोकांना दहन करण्यासाठी शिवाजीनगर गावात एकच मुख्य स्मशानभूमी द्यावी या ठरावाला कोणीही अनुमोदन द्यायला तयार न्हवते. पण मी क्षणाचाही विचार न करता अनुमोदन दिले. आणि आग्रह धरला कि हा ठराव मान्य करावा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शिवाजीनगर गावातील वंचित आणि शोषितांचे कैवारी म्हणवून घेणारे हळूच उठून गेले होते. मला काही वयाने जेष्ठ पण विचाराने अति कनिष्ठ लोकांनी बाजूला बोलावून घेतले आणि म्हणाले, 'आरं बाबा हे कशाला काढतुयास, आपला धर्म बुडवशील.' मला असले बुरसटलेले विचार आवडत नाहीत. मी कधी वयाने मोठ्या लोकांचा अपमान वजा पाणउतारा करत नाही. पण नाईलाजास्तव त्या वयाने जेष्ठ पण विचाराने कनिष्ठ असलेल्या व्यक्तीला माझ्या शिव्या खाव्या लागल्या. मी माझ्या मुद्यावर ठाम होतो. काहीही झालं तरी गावात सगळ्यांसाठी एकचं स्मशानभूमी पाहिजे. मी ठराव मंजूर करून घेतला. काहींनी मला इतर समाजाची बाजू घेतोय म्हणून वाळीत टाकण्यासारखा प्रकार केला पण तो निष्फळ ठरला. कारण आत्ताची तरुण पिढी वैचारिक पुढारलेली आहे. सवर्ण समाजातील तरुण मला भेटून माझी बाजू योग्य असल्याचे ठामपणे सांगत होते. काही जुन्या आणि स्वार्थी गाव पुढाऱ्यांनी पुन्हा-पुन्हा गावात जातीयवाद पसरवायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी समता स्थापन व्हावी, जातीभेद संपावा यासाठी माझी कसरत होत होती. पण वंचित-सोशीत, बहुजन आणि सगळे शिवशक्ती फाउंडेशनचे कार्यकर्ते जातीयतेच्या पलीकडे जाऊन समतेच्या यज्ञात सहभागी होत होते.

cast discrimination
हाच तो स्मशानभूमीतील जातीभेद संपवणारा कागद. कदाचित याचेचं फळ माझी हद्दपारी असू शकेल.

आजकाल प्रत्येक समाजाने आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत. मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो. बौद्ध समाज भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती-उत्सव साजरा करतो. माळी समाज महात्मा जोतिबा फुले यांचा जयंती-उत्सव साजरा करतो. महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती धनगर समाजातील पोरं मोठ्या उत्साहाने साजरी करतात. नरवीर राजा उमाजी नाईक यांची जयंती रामोशी समाज आनंदाने साजरा करतो. हे सगळे महापुरुष प्रत्येकाने वाटून घेतले आहेत. जातीव्यवस्था न मानणारा समाज महामानवांना विशिष्ठ जातीचं लेबल लावून त्यांची महानता आपल्या जातीपूर्ती मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक ह्या सगळ्या महामानवांनी कधीच भेदभाव केला नाही. पण त्यांच्या विचारांचा डांगोरा पिटणारे प्रस्थापित मात्र जाती-जातीत भांडणे लावून सामाजिक दरी वाढविण्यासाठी प्रयत्न करतायत. असा सामाजिक भेदभाव संपावा म्हणून मी सगळ्या महापुरुषांचा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, राजमाता जिजाऊ, महाराणी अहिल्यादेवी होळकर, डॉ, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, नरवीर राजा उमाजी नाईक या महामानवांचा संयुक्त जयंती उत्सव-साजरा केला. मराठ्या शेजारी दलित, मुस्लीमा शेजारी लिंगायत, माळी शेजारी धनगर, असे वेगवेगळ्या जातीचे लोकं एकत्र येऊन बसले होते. विचारवतांनी प्रबोधन केले. विचारवंतांनी विचारांनी या सामान्य लोकांच्या डोक्यातील जात आणि भेदाभेद काढून टाकला होता. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी गळ्यात-गळे घालून भेट घेतली. माझा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश सफल झाला. ही गळाभेट बघताना माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले.

पण काहीजणांनी यातसुद्धा राजकारण बघितले, कार्यक्रमात दंगा करण्याचा, कार्यक्रम हाणून पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हे तेच लोक होते जे समता स्थापन होऊ नये, सगळे समाज एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहू नये म्हणून प्रयत्नशील असतात. हे तेच लोकं होते जे स्मशानभूमीत सुद्धा जातीभेद करत होते. हे तेच लोकं होते. ज्यांना सगळ्या समाजाची एकत्र स्मशानभूमी नको होती. असे नामर्द प्रत्येक गावात असतात. जातीचं विष पेरून स्वतःची पोळी भाजणारे आणि प्रस्थापितांची हुजरेगिरी करणारे प्रत्येक गावात असतातचं. फक्त यांचा बंदोबस्त करायला कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व्हायला लागतंय. म्हणजे मी काय महापुरुष झालो असे नाही. किंबहूना त्यांच्या कणभरपन माझी पात्रता नाही. पण जेवढी आहे ती त्यांचे विचार तळागाळात रुजवण्यासाठी मी खर्ची घालत आहे. यासाठी मला असंख्य दुःख यातना भोगाव्या लागतायंत पण त्याची मला खंत नाही. जातीभेद निर्मूलन हा माझ्या संस्थेचा मुख्य उद्देश आणि माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. त्यामुळें अश्या हजारो संकटाना तोंड देऊन समता स्थापन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. ज्यावेळी मरून दुसऱ्या लोकांत जाईन त्यावेळी हे महापुरुष माझ्यावर शाबासकीची थाप टाकतील हा माझा एकमेव स्वार्थ आहे. यासाठी मी माझे प्राण सुद्धा देण्यास मागेपुढे पाहणार नाही.


आपलाच दोस्त, काहीजणांचा दुष्मन,

प्रमोद महादेव मांडवे

धर्म-जात: माणुसकी हाच धर्म, समाजसेवा हेच कर्म (माझा धर्म-जात मुद्दाम तपासणाऱ्यांसाठी)


जातीभेद निर्मुलन उपक्रमाअंतर्गत शिवशक्ती महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सवातील क्षणचित्रे.

 

शिवशक्ती आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्हिडिओ खाली पहा.

 

#प्रमोदपर्व #Pramod #Mandve #Shivshakti #Social #Foundation #Ngo #IsupportPM #JanNeta #Pmsaid #PramodSpeaks

217 views0 comments

Join PM'S Contact List & Never Miss An Update

arrow&v
bottom of page